विचारधारा

भारतापासून दूर राहताना “अमृताशी देखील पैजा जिंकणाऱ्या” आपल्या मराठी भाषेविषयी,  कलेविषयी,  संस्कृतीविषयी प्रत्येकाच्या मनात एक ओढ असते, पण ती व्यक्त करण्याकरिता एक साधन लागतं; एक संधी लागते; आणि तीच संधी सगळ्या हॉलंडस्थित मराठी माणसांना मिळावी आणि या सामुदायिक साहचर्यातून, मराठी लोकांचे सांस्कृतिक एकत्रीकरण व्हावे, या उदात्त विचारातून २०११ मध्ये ‘रश्मिन’ कलोपासक समूहाच्या सांस्कृतिक आणि सामाजिक चळवळीची मुहूर्तमेढ रोवली गेली. २०१५ साली महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून ‘रश्मिन’ संस्कारित “नेदरलँडस् मराठी मंडळ” आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो.

प्रायोगिक, सृजनशील आणि कलात्मक कार्यक्रम, नृत्य, नाट्य, संगीत, कला, साहित्य आणि सामाजिक जाणिवा अशा विविध क्षेत्रांत ‘रश्मिन’ चळवळ रुजली आहे. शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, चित्रपट संगीत इत्यादींच्या मैफिलींसह संगीताची ही वाटचाल निरंतर चालू आहे. नाटक आवडत नाही असा मराठी माणूस विरळाच!!! आणि म्हणूनच ‘रश्मिन’ने हॉलंडमध्ये “नाट्यधारा” हा अनोखा कलाविष्कार यशस्वीरीत्या सुरु केला! संगीत नाटक, विनोदी नाटक, आणि विविध आशयघन कलाकृतींच्या नाट्याविष्काराने अखिल मराठी प्रेक्षक हुरळून जातो. मराठी चित्रपटांचा प्रसार आणि त्यांची प्रसिद्धी करण्यामध्ये नेदरलँडस् मराठी मंडळाचा हातभार लागत आहे याचा ‘रश्मिन’ला अभिमान आहे. चित्रपटांबरोबर सुप्रसिद्ध मराठी कलाकारांना भेटण्याच्या, त्यांच्याशी दिलखुलास गप्पा मारण्याच्या विविध संधी आम्ही हॉलंडस्थित मराठी मित्र-मैत्रिणींसाठी यापूर्वीही घेऊन आलो आणि यापुढेही आणत राहू.

ज्या माय-मराठीमुळे आपले अस्तित्व आहे, त्या भाषेची सेवा केल्याशिवाय ही सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळ पूर्ण होऊच शकत नाही आणि म्हणूनच मातृभाषेचे योग्य महत्त्व जपण्यासाठी व टिकवण्यासाठी गेली चार वर्षे सातत्याने ‘रश्मिन’ चा दिवाळी अंकाचा प्रकल्प यशस्वीरीत्या चालू असून केवळ युरोपातीलच नव्हे तर विविध युरोपियन देशांतील मराठी बांधव यात सक्रिय सहभाग घेत आहेत, याचा आम्हाला नक्कीच अभिमान वाटतो.

परदेशातील मराठी मंडळांचा उद्देश केवळ मनोरंजन नसून, त्याही पुढे जाऊन भारत अथवा महाराष्ट्रस्थित समाजाचा आर्थिक, शैक्षणिक आणि सर्वांगीण विकास घडवण्यास मदत करणे हा असावा. याच सामाजिक जाणिवेतून, ‘रश्मिन’ संस्कारित नेदरलँडस् मराठी मंडळ सामाजिक क्षेत्रातदेखील विविध उपक्रमांद्वारे मार्गक्रमण करीत आहे. एका लहान रोपट्याचे अशा एका मोठ्या सामाजिक व सांस्कृतिक चळवळरुपी वटवृक्षात रुपांतर होताना बघून ‘रश्मिन’ ला अभिमान वाटतो.

आत्तापर्यंतच्या वाटचालीत आपण दिलेल्या सहकार्याबद्दल आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो. ‘रश्मिन’ समूहाच्या नेदरलँडस् मराठी मंडळात विविध सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्यास आपणास नक्कीच आनंद होईल. आपणा सर्वांना नेदरलँडस् मराठी मंडळाचे सदस्य होण्याचे जाहीर आवाहन आम्ही करीत आहोत.

कार्यकारिणी मंडळ [MAY 01, 2015 ]